मुलाखतीचा आमना -सामना ! विरोधकांची टीका ; सेनेचे प्रत्युत्तर

Foto
शिवसेनेचे मुखपृष्ठ सामना'मध्ये सुरू असलेल्या शरद पवार यांच्या मुलाखतीची मोठी चर्चा आहे. एकेकाळी कट्टर विरोधक असलेले दोन पक्ष एकत्र येतात पण सत्तेचा मुकुट परिधान करतात. आज तर थेट सामनात शरद पवारांचा भलामोठा फोटो पाहून शिवसैनिकांच्या हृदयात कालवाकालव झाल्याशिवाय राहिली नाही. यात मुलाखतीवरून मनसे तसेच एमआयएमने टीकास्त्र सोडले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनीही मग टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. 
 विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात समीकरणे बदलली गेली. पाच दशके ज्यांच्या विरोधात शिवसेना लढली त्यांच्याच मांडीला मांडी लावून आता सत्तेत बसली आहे. शिवसेनेचा आवाज समजले जाणारे वृत्तपत्र सामनामध्ये शरद पवारांच्या मुलाखतीचा सिलसिला आता सुरू झाला आहे. यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
सगळे राजकीय दुकाने मांडून बसलेत : खा. इम्तियाज जलील 
राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा मित्र आणि शत्रू नसतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कित्येक दशके एकमेकांविरोधात लढलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्तेच्या मोहापायी एकत्र आले. जनतेशी, कार्यकर्त्यांशी, मतदारांशी त्यांना काहीही देणे घेणे उरले नाही. सत्तेचा मलिदा फक्त त्यांना हवा आहे. शरद पवारांनी सगळी हयात शिवसेनेच्या विरोधात खर्ची घातली. आता मात्र त्यांना शिवसेना प्यारी झाली आहे. बाळासाहेब असताना काँग्रेस-राष्ट्रवादीला कधीही दरवाजे खुले झाले नाहीत. आता मात्र सामना'च्या पहिल्या पानावर शरद पवारांचा फोटो दिमाखात छापला जातो. बदललेली परिस्थिती शिवसैनिकांच्या जिव्हारी लागणारीच आहे. मतदारांना बेवकुफ बनवण्याचा हा धंदा वर्षानुवर्ष सुरूच आहे. मतदारांनीच आता विचार करण्याची वेळ आली आहे.
शिवसैनिकांच्या काळजात धस्स झाले असेल : मनसे जिल्हाप्रमुख सुहास दाशरथे 
हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची घट्ट मैत्री होती. अगदी कौटुंबिक जिव्हाळाही त्यांनी जपला. मात्र राजकारण आणि मैत्री याची सरमिसळ केली नाही. उद्धव ठाकरेंनी मात्र राजकीय फायद्यासाठी संघटनाच पणाला लावली. सत्तेसाठी थेट सिल्वर ओकवर गेले. त्यामुळे शिवसैनिक नाराज आहेत. राजकारणाचा स्तर किती खाली गेला याचे हे उत्तम उदाहरण आहे. शिवसैनिकांची नाराजी सेनेला महागात पडणार आहे. येत्या काळात हिंदुत्ववादी जनता शिवसेनेला नक्की त्यांची जागा दाखवतील यात शंका नाही.

शरद पवार मोठे नेते : माजी खासदार चंद्रकांत खैरे शरद पवार राज्याचे मोठे नेते आहेत. केंद्रात सक्रिय असताना त्यांनी सर्व मराठी खासदारांना सन्मानाची वागणूक दिली. नेहमीच मदतीसाठी धावून आले. कधीही फोन केला तर ते मदतीसाठी तत्पर असायचे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत त्यांची घट्ट मैत्री होती. तोच मैत्रीचा धागा आजही कायम आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून शरद पवार आणि शिवसेनेचे संजय राऊत हे दोन नेते सत्तेचे चाणक्य समजले जातात. म्हणूनच त्यांची मुलाखत महत्त्वाची ठरते. भाजपच्या दगाबाज राजकारणाला संजय राऊत यांनी लगाम लावला. आताही ऑक्टोबर महिन्यात भाजप गडबड करू शकते हे उघड करून सावधानतेचा इशारा दिला आहे. दुसरीकडे भाजप कायम दहशतीचे राजकारण करीत आला आहे. माजी मुख्यमंत्री फडणवीस यांना फोडाफोडीचे राजकारण चांगले जमते. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना सावध झाली असेल. कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय असल्याने आदित्य ठाकरे यांना उपजतच राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. गेल्या १० वर्षात त्यांनी स्वतःला सिद्ध केले हे नाकारता येणार नाही. त्यामुळे नया है वह म्हणणाऱ्या फडणवीसांनी याचाही विचार करावा, असा टोला खैरेंनी लगावला.